लहानपणापासून मला फोटोग्राफीची आवड कशी लागली कळलेच नाही. त्यातून जगदीश माळर्लोसारख्या महान फोटोग्राफरने मला त्यांच्या पंखाखाली घेऊन ज्ञान दिले हे माझे भाग्य आहे. १९८९ साली शरद कोटणीसांनी निखिल वागळेंना मला सामावून घेण्याची विनंती केली. लगेच १९९० साली महानगर सायंदैनिकाचा जन्म झाला. वागळेंनी मला संपूर्ण स्वातंत्र्य दिले काम करायचे. संध्याकाळी दैनिकासाठी चांगले फोटो फाईल व्हायला पाहिजेच, इतकीच त्यांची रास्त अपेक्षा असायची. मग काय मी राजकारण, समाजकारणाबरोबर खेळाचेही फोटो काढायला लागलो. दैनिकाच्या फोटोग्राफरने कसे काम करायला पाहिजे याचे मार्गदर्शन मोहन बनेने मला सुरुवातीपासून केले.
एमप्रायजी क्लबच्या जवळ राहात असल्याने क्रिकेटचे वेड होते. नंतर ते भयानक प्रमाणात वाढत गेले. तोच काळ होता की, सचिन तेंडुलकर नावाचा तारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकू लागला होता. तसे बघायला गेले तर सचिनला मी शालेय क्रिकेटपासून बघत होतो. त्याची आणि विनोद कांबळीची जोडी शालेय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालायला लागल्यापासून आमचे त्यांच्याकडे बारीक लक्ष होते. भारतीय संघाकडून खेळू लागल्यावर सचिन सरावासाठी शिवाजी पार्कपेक्षा एमआयजी क्लबला यायला लागला होता. सचिन सराव करत असताना तो अभ्यासायचा याचा मला छंद लागला. सचिनला सराव करताना कोणीही त्रास दिलेला आवडायचा नाही याची मला लगेच जाणीव झाली होती. म्हणून मी नेहमी अंतर ठेवून नुसता त्याचा सराव बारकाईने बघायचो आणि त्याने सिग्नल दिला की, मगच कॅमेरा बाहेर काढायचो. मला कळून चुकले होते की, योग्य अंतर ठेवले की, सचिन नंतर संधी द्यायचा. सचिन जेव्हा अजित तेंडुलकरबरोबर सरावाला यायचा तेव्हा नेहमी चार हात लांब राहाणारा मी ८ हात लांब राहायचो इतका न सांगता अजितचा दरारा होता.
सचिनचा सामन्यातील खेळ सगळ्यांनीच बघितला, त्याचा आनंद घेतला. मला एकच गोष्ट नेहमी स्पष्टपणे जाणवायची, ती म्हणजे सचिन सामन्याइतकीच समरसता सरावात ठेवायचा. तसेच सराव करताना कमालीची कल्पकता दाखवायचा. शेन वॉर्न विरुद्ध कसोटी मालिका खेळायची तयारी त्याने एकदम खराब खेळपट्टीवर केली, जिथे हातभर चेंडू वळत होता. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर वेगवान मार्याला तोंड देण्याची तयारी सचिन सिमेंट विकेटवर चेंडू ओला करून निम्म्या अंतरावरून जोरात फेकायला लावून करायचा, एकदा तर प्लॅस्टिक शीट टाकून त्यावर पाणी ओतून प्लॅस्टिकचा चेंडू तुफान वेगाने येताना तो खेळायचा सराव करताना मी बघितले आहे. सचिनच्या यशाचे गमक त्याने अत्यंत विचारपूर्वक कल्पकतेने केलेल्या सरावात दडले आहे हे मी अनुभवाने सांगू शकतो.
सरावादरम्यान त्याच्या चेहन्यावर एकाग्रता दिसायची. दुसरीकडे आचरेकर सरांना भेटायला गेल्यावर सचिन आणि सरांच्या चेहऱ्यावर निर्माण होणारे हसू खूप कमाल असायचे. सचिन भेटायला येणार म्हटल्यावर आचरेकर सर आवरून त्यांची लाडकी टोपी घालून तयार राहायचे. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळीच कथा सांगायचा. गुरु-शिष्य एकमेकांना भेटत असताना त्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले ही क्रिकेट देवाची कृपा मानतो मी. माझ्यासाठी ते क्षण कॅमेरऱ्यात टिपणे हा सर्वोच्च आनंदाचा भाग होता.
खेलाडू म्हणून सचिन महान आहे हे वेगळे सांगायची गरज नाहीये. माणूस म्हणून सचिन किती चांगला याची अनेक उदाहरणे मला देता येतील. खासकरून शारीरिक व्याधी जडलेल्या मुलांना वेळ देताना सचिनमधला हळवा माणूस मला दिसायचा. बऱ्याच वेळेला धनदांडग्यांना भेटायला टाळणारा सचिन लहान मुलांना नुसता वेळ नाही यायचा तर त्यांच्यासोबत क्रिकेट आनंद घेत खेळायचा.
Send as free online greeting card
Email a Friend
Manage Wishlist